31.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeसोलापूरथकीत पगारीसाठी कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोंगा

थकीत पगारीसाठी कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोंगा

सोलापूर – ( प्रतिनिधी) – मोहोळ तालुक्यातील पुळूज येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यापासून पगार झालेला नाही. साखर कारखाना कामगार संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागील ३० महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्यावतीने साखर कारखान्यासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्याबरोबर थकीत पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत तसेच सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २०१८ पासूनचे फायनल पेमेंट व पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व ३० महिन्याचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत जाब विचारण्यात आला होता .याचप्रश्नी २०२३ आणि २०२४ साला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकीत पगार व फंड तसेच फायनल पेमेंट बाबत बैठक होऊन २०२४ पर्यंत सर्व पगार व थकीत पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात लिहून दिले होते .

मात्र अद्यापही या कामगारांच्या मागण्यांना कारखाना प्रशासनाने म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. कामगारांना काही न देता बाहेर कंत्राटी कामगाराकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत. कायम कामगारांना घरी बसून कंत्राटी कामगारांना काम देण्याला संघटनेचा विरोध असून संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी दिला आहे.

या आंदोलनाप्रसंगी रमेश काळे ,संतोष भोसले, संजय चव्हाण ,भारत पवार, सुरेश डोंगरे यांच्यासह भीमा साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR