परभणी : दसरा आणि दिवाळी सणा निमित्त रेल्वे प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या करीमनगर-पुणे आणि नांदेड-पनवेल साप्ताहिक विशेष गाड्यांना दैनंदिन चालवावे. यासोबत पुणे, मुंबई, नागपुर, सोलापूर, कोल्हापूर, मैसूरू दरम्यान विशेष दैनंदिन गाड्या सुरू कराव्यात. दसरा सण सुरू होण्यापूर्वी नवरात्रात मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसला नांदेड पर्यंत विस्तारीत करण्यात यावे.
नांदेड- छ. संभाजीनगर दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत दर २ तासाचा अंतरावर इमो लोकल चालवण्यात यावी. नांदेड येथून दक्षिणकडे धावणा-या सर्व गाड्यांना छ. संभाजीनगर येथून चालविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे सदस्यांनी नांदेड येथील महाप्रबंधक नीति सरकार आणि मुख्य परिचालन प्रबंधक श्रीनाथ यांना प्रत्यक्ष भेटून दिले व वरील मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी महाप्रबंधक सरकार यांनी विजयादशमीच्या दरम्यान तसेच धनत्रयोदशी पासून भाऊबीज पर्यंत विषेश करुन लक्ष्मी पूजनच्या एक दिवस अगोदर पुणे किंवा पनवेल पासून दररोज धावणारी रेल्वे चालवण्यासाठी अधिका-यांना सूचित केले. छ.संभाजीनगर येथे पीट लाइन झाल्यावर अनेक नवीन गाड्यांना चालविण्याची माहीती दिली. या वेळेस आपरेशन मॅनेजर श्रीनाथ यांनी येत्या काही दिवसांत नांदेड-रायचूर-परभणी एक्सप्रेसला जालना पर्यंत वाढवून जालना-रायचूर-जालना दरम्यान तर हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेला वाशिम पर्यंत तर बेंगलुरु-नांदेड रेल्वेची गती वाढवून अदिलाबाद पर्यंत तर मराठवाडा एक्स्प्रेसला धर्माबाद ऐवजी नांदेड पासून चालविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान छ. संभाजीनगर येथून नागपूर दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे, जालना-छपरा साप्ताहिक रेल्वेला नांदेड पासून चालविण्यात यावे. तिरुपती-निजामाबाद रायलसीमा एक्सप्रेसला एक अतिरिक्त रॅक जोडून छ.संभाजीनगर पर्यंत विस्तार करावे. बेंगलुरु-नांदेड रेल्वेला अदिलाबाद ऐवजी नागपूर पर्यंत विस्तार करून चालविण्याची मागणी मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरूण मेघराज, किरण चिद्रवार, अमित कासलीवाल आदिंनी केली आहे.