24.7 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रदहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये

मुंबई : पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय चुकीचाच आहे. ‘आशिया कप’मध्ये भारतीय संघ सहभागी होत असला तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये. केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अजूनही निर्णय घेत नसेल तर बीसीसीआय सरकारपेक्षा मोठे नाही, असे मत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

एक देश-एक निवडणूक, आशिया कप, सर्वपक्षीय शिष्टमंडळ, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा विविध विषयांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आपले मत मांडले. सरकारने पाकिस्तानला जागतिक पातळीवर घेरण्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी नावे देण्यासंदर्भात पक्षांना विचारण्यात आले. निदान काँग्रेसला तरी विचारण्यात आले. यासाठी काँग्रेसने नावे दिल्यानंतर मात्र त्यातून केवळ एकाच सदस्याची निवड करण्यात आली. हा त्या पक्षाचा अपमान असल्याचे ते म्हणाले.

या शिष्टमंडळात खासदारांसह इतर सदस्य असल्याने या शिष्टमंडळाला संसदीय शिष्टमंडळ म्हणता येणार नाही. अशा बाबीसाठी संसदीय शिष्टमंडळाची आवश्यकता होती, असे चव्हाण म्हणाले. त्याचप्रमाणे पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा घेतलेल्या निर्णयातून नेमके काय साध्य होणार आहे. यासंदर्भात सर्वपक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे विशेष अधिवेशनाचीही मागणी करण्यात आली होती, तेही घेतलेले नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
देशाने युद्धकाळात पारदर्शकता राखली पाहिजे. १९६५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, १९७१ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेस नियमित माहिती दिली होती. मात्र पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना पत्रकार परिषद घेतात. भारताचे पाकव्यात्त काश्मीरबाबत स्पष्ट धोरण असायला हवे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

एक देश-एक निवडणूक म्हणजे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेणे हा मुद्दाच व्यवहार्य नाही. एकावेळी निवडणुका घेताना इतक्या मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मशिन आणणार कोठून, त्याचप्रमाणे मनुष्यबळाचेही काय करणार? असा सवाल त्यांनी केला. पण ब्रिटिश संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. आपण स्वत: १९९६, १९९८ आणि १९९९ या तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते आणि त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील, असेही चव्हाण म्हणाले.

‘एक देश – एक निवडणूक’याला आमचा विरोध
‘एक देश – एक निवडणूक’ ही संज्ञा जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या ‘एक देश – एक नेता’ या संज्ञेप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्याकडून ठसवली जात आहे. याला एकत्रित निवडणूक असेही म्हणता आले असते. केंद्र सरकार अमेरिका प्रणालीप्रमाणे निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी घटनादुरुस्ती केली जाणार असून याला काँग्रेसचा पूर्ण विरोध असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR