– डीजीएमओ घई यांची माहिती, १०० अतिरेकी ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी ज्या क्रूरतेने २६ निष्पापांचे जीव घेतले, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे दहशतवादाचे कट आखणा-यांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे हे लष्करी उद्दिष्ट ठेवून ऑपरेशन सिंदूरची संकल्पना मांडण्यात आली होती. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डीजीएमओचे राजीव घई यांनी दिली. भारतीय सेनेच्या कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला तर दहशतवादी तळांवरील हल्ल्यांत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले.
सशस्त्र दलाच्या पत्रकार परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि एअर मार्शल ए. के. भारती यांनी ऑपरेशन सिंदूरची तपशीलवार माहिती दिली.एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, ७ मे रोजी इतर कोणत्याही पायाभूत सुविधा, विशेषत: पाकिस्तानी नागरी किंवा लष्करी आस्थापनांना टाळून, दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हे उद्दिष्ट होते. हे ध्येय साध्य करण्याच्या अचूकतेवर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, अनेक हवाई क्षेत्रे आणि डंपवर हवेतून वारंवार पाकिस्तानकडून हल्ले झाले, जे सर्व हाणून पाडण्यात आले. अहवालानुसार ७ ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचे अंदाजे ३५ ते ४० जवान मृत्युमुखी पडले असल्याचे म्हटले जात आहे.
कमांडर्सना कारवाईची सूट
लष्कराच्या प्रमुखांनी आज एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे कोणत्याही पद्धतीने उल्लंघन झाल्यास लष्कर प्रमुखांनी कमांडर्सना प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सूट दिलेली आहे, असे राजीव घई यांनी सांगितले.
४० पाकिस्तानी सैनिक ठार
पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्टयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. सीमेपलिकडून होणा-या गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाई दरम्यान भारतीय सैन्याने केवळ नियंत्रण रेषेवर ३० ते ४० पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी मारले, असे डीजीएमओ घई यांनी सांगितले.