23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रदिंडोरीत काका-अण्णांची प्रतिष्ठा पणाला

दिंडोरीत काका-अण्णांची प्रतिष्ठा पणाला

निफाड विधानसभेतील कट्टर विरोधकांमध्ये मताधिक्यासाठी चुरस

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे गुरुजी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. खरे तर डॉ. भारती पवार केंद्रीय राज्यमंत्री आहेत. मात्र, या भागात कांद्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. कांदा उत्पादक शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहेत. तसेच या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भगरे यांनी डॉ. पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यातच या लोकसभा निवडणुकीकडे अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी विधानसभेची रंगीत तालिम समजत आहेत. याच मतदारसंघातील निफाड विधानसभा मतदारसंघातही विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांची म्हणजे अण्णा-काका यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निफाडमध्ये विद्यमान आमदार दिलीप बनकर हे खरे तर शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. परंतु ते अजित पवार गटात गेले असून, महायुतीचा धर्म म्हणून ते भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा प्रचार करीत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. भारती पवार यांच्यासाठी काम करणारे माजी आमदार अनिल कदम आता तुतारीचा प्रचार करीत आहेत. या दोघांमध्ये निफाडमध्ये राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपल्याच उमेदवाराला कसे मताधिक्य देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निफाड विधानसभा मतदारसंघदेखील येतो. निफाडच्या राजकारणाचा नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा हेदेखील आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निफाडमध्ये काका-अण्णांच्या राजकारणावर समीकरणे जुळून येतात. मागील लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांच्या विजयासाठी निफाडने मोठ्या प्रमाणात आपला कौल दिला होता. अनिल कदम यांनी निफाडची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन भारती पवारांना मोठे मताधिक्य दिले. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली असल्याने दिलीप बनकर हे भारती पवारांच्या प्रचारात उतरले आहेत तर महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंच्या विजयाची धुरा अनिल कदम यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे अण्णा आणि काकांच्या राजकारणाचा नेमका फायदा कोणाला, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांपैकी निफाड विधानसभा मतदारसंघ देखील महत्त्वाचा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत शेतक-यांचे प्रश्न आणि राजकीय समीकरणाची बदलती किनार बघता अनिल कदम हे भास्कर भगरेंसाठी प्रचार करत आहेत तर भारती पवारांच्या प्रचारासाठी दिलीप बनकर हे मैदानात उतरले आहेत. निफाडच्या मतांचा नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा हे निवडणुकीनंतरच समजेल. मात्र, शेतक-यांच्या प्रश्नांमुळे निफाडचा मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे निफाडमधून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी भारती पवारांच्या प्रचारात उतरले आहेत.
शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप बनकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या विरोधात प्रचार करणा-या अनिल कदम यांनी मात्र यंदा पवारांच्या उमेदवाराची वाट दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा विडाच उचलल्याचे पाहायला मिळत आहे.

कदम यांचा तुतारी वाजविण्याचा निर्धार
यंदा वाजणार तर तुतारीच, असा विश्वास व्यक्त करत माजी आमदार अनिल कदम हे भारती पवारांच्या विरोधात निफाडचे मैदान गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निफाडमधील कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम
निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम हा राजकीय संघर्ष असताना या दोन आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे ही लढत न बघता थेट विधानसभेची रंगीत तालीम समजून दिलीप बनकर आणि अनिल कदम हे दोघे निफाडचा कौल हा आपापल्या उमेदवाराला देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR