25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeराष्ट्रीयदिल्ली विधानसभेसाठी आज मतदान

दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज बुधवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. १.५६ कोटी लोक सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करू शकतील. यासाठी तब्बल १३ हजार पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कठऊकअ ब्लॉकचा भाग असलेले पाच पक्ष दिल्ली निवडणुकीत एकमेकांविरोधात मैदानात आहेत. यात आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सर्व ७० जागांवर एकमेकांविरोधात आहेत.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ‘आप’ पुन्हा दिल्लीवर सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार की भाजप दिल्लीचा गड जिंकणार हे लवकरच स्पष्ट होईल.

१) नवी दिल्ली : शीला दीक्षित २००८ मध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या, परंतु २०१३ पासून ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल सलग तीन वेळा निवडून आले आहेत. या जागेची सर्वाधिक चर्चा आहे. कारण येथे भाजपचे वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात उभे आहेत. २०२०च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना ४६,७५८ मते मिळाली होती तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुनील कुमार यादव यांना २५,०६१ मते मिळाली होती.

 

२) जंगपुरा :
‘आप’ने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना येथून तिकिट दिल्यावर जंगपुरा जागेची चर्चा सुरू झाली. मनीष सिसोदिया हे पटपरगंज येथून निवडणूक लढवत आहेत. पण यावेळी त्यांची जागा बदलण्यात आली. २००८ मध्ये, काँग्रेसचे तरविंदर सिंग मारवाह यांनी जंगपुरा येथील या जागेवरून तीन वेळा आमदार राहिलेल्या सिसोदिया यांच्या विरोधात निवडणूक जिंकली होती. तर २०१३ मध्ये ‘आप’चे मनिंदर सिंग धीर आणि २०१५ आणि २०२० मध्ये प्रवीण कुमार विजयी झाले. आता मारवाह भाजपमध्ये आहेत. यावेळी भाजपने त्यांना येथून तिकिट दिले आहे. तर फरहाद सुरी काँग्रेसकडून रिंगणात आहेत.

३) कालकाजी :
कालकाजी हे दिल्लीतील एक लोकप्रिय ठिकाण आहे. मुख्यमंत्री आतिशी येथून आमदार आहेत आणि यावेळी ते ‘आप’चे उमेदवार देखील आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजपने त्यांचे माजी खासदार रमेश बिधुरी यांना तिकिट दिले आहे तर काँग्रेसने माजी आमदार अलका लांबा यांना तिकिट दिले आहे. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसने कालकाजी मतदारसंघ जिंकला होता. २०१३ मध्ये ही जागा अकाली दलाकडे गेली ज्यात हरमीत सिंग कालका विजयी झाले होते. २०१५ मध्ये ‘आप’ने अवतार सिंग यांना तिकिट दिले जे पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करत होते. गेल्या निवडणुकीत आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या धरमबीर यांच्याकडून सुमारे ११ हजार मतांनी निवडणूक जिंकली होती.

४) ओखला :
‘आप’चे अमानतुल्ला खान हे ओखला येथील आमदार आहेत. ते येथून दोन वेळा आमदार आहेत. यावर चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा उर रहमान खानला तिकिट दिले आहे. भाजपने मनीष चौधरी आणि काँग्रेसने अरीबा खान यांना उमेदवारी दिली आहे. २०२० मध्ये अमानतुल्ला खान यांनी ही जागा मोठ्या फरकाने जिंकली होती. त्यांना ६६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली.

५) पटपडगंज :
पटपडगंजची चर्चा मनीष सिसोदिया यांनी ही जागा सोडल्यामुळे आणि अवध ओझा यांना ‘आप’ने उमेदवारी दिल्याने होत आहे. गेल्या तीन निवडणुकांपासून सिसोदिया या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

६) बादली :
अजेश यादव गेल्या दोन निवडणुकांपासून येथील आमदार आहेत. तर ही जागा पहिल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपकडे होती आणि पुढील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसकडे होती. ‘आप’ने पुन्हा एकदा अजेश यादव यांना तिकिट दिले आहे तर काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने दीपक चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

७) मुस्तफाबाद
मुस्तफाबाद मतदारसंघाची चर्चा एआयएमआयएमने उमेदवार बनवलेल्या ताहिर हुसेनबद्दल आहे. ते भाजपचे मोहन सिंग बिश्त, काँग्रेसचे आदिल अहमद खान आणि काँग्रेसचे अली मेहंदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. गेल्या चार निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर, ही जागा २००८ आणि २०१३ मध्ये काँग्रेसने, २०१५ मध्ये भाजपने आणि २०२० मध्ये ‘आप’ने जिंकली होती.

८) ग्रेटर कैलास : मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज हे ग्रेटर कैलासमधून उमेदवार आहेत. सौरभ भारद्वाज हे येथून तीन वेळा आमदार आहेत. त्यांच्या आधी २००८ मध्ये भाजपचे विजय कुमार मल्होत्रा ​​यांनी ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत सौरभ भारद्वाज भाजपच्या शिखा राय आणि काँग्रेसच्या गरवीत सिंघवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

९) करावल नगर : भाजपने कपिल मिश्रा यांना येथून तिकिट दिल्याने करावल नगर जागा चर्चेत आली. निवृत्त आमदार मोहन सिंग बिष्ट यांना तिकिट न देण्यावरून वाद झाला होता, परंतु त्यांना मुस्तफाबादची जागा देण्यात आली. करावल नगरमध्ये २००८ आणि २०१३ च्या निवडणुका मोहन सिंग बिश्त यांनी जिंकल्या होत्या, २०१५ च्या निवडणुका कपिल मिश्रा यांनी जिंकल्या होत्या आणि २०२० च्या निवडणुका मोहन सिंग बिश्त यांनी जिंकल्या होत्या. जेव्हा कपिल मिश्रा निवडणूक जिंकले तेव्हा ते ‘आप’मध्ये होते. कपिल मिश्रा येथे ‘आप’चे मनोज त्यागी आणि काँग्रेसचे पी. के. मिश्रा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

१०) शकूर बस्ती – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना ‘आप’ने पुन्हा तिकिट दिले आहे. ते शकूर बस्तीचे ३ वेळा आमदार आहेत. यापूर्वी २००८ मध्ये श्यामलाल गर्ग यांनी निवडणूक जिंकली तेव्हा ही जागा भाजपच्या खात्यात होती. सत्येंद्र जैन हे भाजपचे कर्णैल सिंग आणि काँग्रेसचे सतीश लुथरा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR