लातूर : प्रतिनिधी
मद्यप्रेमींना महाराष्ट्र सरकारने खुशखबर दिली आहे. ३१ डिसेंबर म्हणजेच थर्टी फर्स्टला मद्य विक्री करण्याची वेळ वाढवली आहे, पहाटे पाच वाजपर्यंत आता दारु मिळणार आहे. ३१ डिसेंबर रोजी वाईन शॉप मध्यरात्री १ पर्यत सुरू राहणार आहेत. तर बीअर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्ट धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. लातूरच्या जिल्हाधिका-यांनी यासंबंधीचे आदेश ही जारी केले आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १९४९चे कलम १४३ (एच १) (आयव्ही) अन्वये नववर्षानिमित्त ३१ डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय ३१ डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे. अवैध दारू विकणा-यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे.
पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी
एफएल-२ विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची, विदेशी मध्य विकणा-या किरकोळ विक्रीच्या दुकानास ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बंद बाटलीतून विक्री केली जाणारी बीअर शॉपी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालू राहतील एफएल-३ (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त पहाटे ५ वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.