29.5 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रदिवाळीच्या फराळाला यंदा महागाईचा तडका!

दिवाळीच्या फराळाला यंदा महागाईचा तडका!

मुंबई : प्रतिनिधी
खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले असून अन्य वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने यंदा दिवाळीचा तयार फराळही महागला आहे. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणा-या डाळ, तेल, साखर, सुकामेवा आदींच्याही किमती वाढल्यामुळे तयार फराळाच्या दरामध्येही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचा भार आता ग्राहकांच्या खिशाला बसल्याने महिलावर्गाकडून फराळ घेतला जात असला तरी दरवर्षीपेक्षा त्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, ही दरवाढ पाहता यंदाची दिवाळी प्रचंड खर्चिक ठरणार असल्याचे मत अनेक गृहिणींनी व्यक्त केले.

दिवाळी म्हटलं की, कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नवीन कपडे, फटाके, फराळाची उत्सुकता असते. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने फराळ बनविण्यासाठी गृहिणी तसेच फराळ विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. चिवडा, शेव, चकली, विविध प्रकारचे लाडू, शंकरपाळे, करंज्या बनवण्यासाठी गृहिणींनी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचे औचित्य साधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र त्याचे दर वाढल्याने गृहिणींच्या चेह-यावर नाराजी दिसत आहे. फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य चणा डाळ, बेसन, तांदळाचे पीठ, रवा, साखर, पिठीसाखर, साजूक तूप, तेल, भाजणी, सुकामेवा, सुके खोबरे या साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. मात्र त्यांच्या किमतीदेखील यंदा वाढल्या आहेत. तेल, चणा डाळ, जिरे, धणे, तेल आणि काजू यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

यावर्षी पावसामुळे काजूचे दर प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्यामुळे सोयाबीन तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत फराळासाठी एकीकडे सोयाबीन तेलाची प्रचंड मागणी असताना दुसरीकडे सोयाबीन तेल महागल्याने सणाच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

यंदाचे फराळाचे दर
भाजणी चकली : ४०० रुपये प्रतिकिलो, तिखट शेव : ३८० रुपये प्रतिकिलो, बेसन लाडू : ६०० ते ७५० रुपये प्रतिकिलो, रवा लाडू : ६०० रुपये प्रतिकिलो, करंजी (रवा सारण) : ७०० रुपये प्रतिकिलो, करंजी (बेसन सारण) : ७५० रुपये प्रतिकिलो, शंकरपाळे : ४५० रुपये प्रतिकिलो, काही ठिकाणी लाडू, करंजी हे नगावर मिळत असून एक नग २५ ते ३० रुपयाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR