छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आणि जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीची व्याप्ती वाढून अग्नितांडवाने हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला आहे.
यादरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान-मोठे प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदी प्राणी सैरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात ब-याच अडचणी निर्माण होत होत्या.
ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला दरवर्षी आग लागल्याची घटना घडत असते. त्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळी आग लागली. बघता बघता ही आग संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात पसरली. ऐतिहासिक वारशाला मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती खराब होत असून कालांतराने त्या नष्ट होण्याची शक्यता असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.