26.7 C
Latur
Saturday, July 19, 2025
Homeलातूरदेवणी तालुक्यात १८ हजार ५९३ जणांनी काढला आयडी

देवणी तालुक्यात १८ हजार ५९३ जणांनी काढला आयडी

देवणी : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे शेतक-यांनी पेरलेल्या पिकांचे नाव आणि क्षेत्र निश्चीत करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता यावी, यासह शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी बनविणे गरजेचे आहे. आतापर्यंत १८ हजार ५८३ शेतक-यांनी सीएससी सेंटरच्या माध्यमातून या फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारकडून देशभरातील शेतक-यांना डिजिटल ओळख निर्माण करून देण्यासाठी आधारकार्डप्रमाणेच युनिक फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या कार्डमध्ये शेतक-यांच्या सर्व कागदपत्रांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तालुक्यात एकूण ३१ हजार ४२५ शेतकरी खातेदार संख्या असून आतापर्यंत १८ हजार ५८३ शेतक-यांनी सीएससी सेंटरच्या माध्यमातून या फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. तालुक्यात कृषी व महसूल विभागाकडून शेतक-यांचे फार्मर आयडी बनविण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच शेतक-यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, सहायक, ग्रामसेवक, तलाठी व सीएससी सेंटरचालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येकवेळी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना नेहमी कागदपत्रांची जमवाजमव करणे त्रासदायक व खर्चिक ठरत असते. तसेच शेतक-यांना कार्यालयात जाऊन हेलपाटे मारावे लागत आहेत पण आता या फार्मर आयडीमुळे खर्च आणि वेळ दोन्ही बचत होणार असून, सर्व शासकीय योजनांचा लाभ आता फार्मर आयडीवर मिळणार आहे. फार्मर आयडी हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आयडी काढण्यासाठी शेतक-यांचे आधारकार्ड, आधारकार्ड संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, शेतक-यांच्या जमिनीचा सातबारा अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतक-यांना फार्मर आयडी मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR