बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ संस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
अजित पवार उद्या बीड दौ-यावर
उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौ-यात पंकजा मुंडे देखील सोबत असणार आहेत. अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच विमानाने संभाजीनगरला पोहोचणार आहेत. तसेच उद्या (३० जानेवारी) बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांसह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बीडच्या डीपीडीसी बैठकीत मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ तारखेला आष्टीत येत आहेत. मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी मतदारसंघात येणार आहेत, असे सुरेश धस म्हणाले. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करा. तेथील पोलिसांची मटकेवाल्यांसोबत अर्धी पार्टनरशिप आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
















