पुणे : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास २८ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अन्त झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अन्त्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. देशभरातील निष्पाप पर्यटक अशा भ्याड हल्ल्याचा बळी ठरावेत, ही बाब अंत:करणाला चटका लावणारी आहे.
या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा अतिरेकी कृत्यांना छेद देणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे, आजच्या काळाची गरज आहे.
दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरण खो-यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
या भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप देसले यांच्यासह अनेक निष्पाप भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी अन्त झाला. आज या दोघांच्याही निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अन्त्यदर्शन घेतले. जगदाळे व गणबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्याकडून हल्ल्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.