मुंबई : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा जीव गेला. हा भारतावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करतो अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
या हल्ल्यातील जी माहिती येते त्यावरून दोन धर्मांत वाद निर्माण व्हावा, देशात वातावरण दूषित करण्याचा हेतू असू शकतो, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केली.
पहलगाम येथे सगळ्यात जास्त पर्यटक फिरायला जातात तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला. पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत. महाराष्ट्रातील सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत, यांना सुखरूपपणे घरी परतण्यासाठी सरकारने आवश्यक ती सगळी मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
या हल्ल्याचा तपास होईल. त्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी म्हणजे पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत दहशतवाद्यांना होणार नाही यासाठी आमचा पाठिंबा सरकारला कायम राहील, असे वडेट्टीवार म्हणाले.
पण पहलगाम जिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात, तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणे ही सरकारची जबाबदारी होती. हा हल्ला झाला तेव्हा तिथे पोलिस, सैन्याची सुरक्षा व्यवस्था नव्हती हे दुर्दैवी आहे. हा हल्ला झाल्यानंतर तिथे सैन्य आणि पोलिस पोहोचले, याचे राजकारण करायचे नाही, पण हे इंटेलिजन्स फेल्युअर देखील आहे अशी टीका त्यांनी केली.
हल्ल्यातील जी माहिती येते त्यावरून दोन धर्मांत वाद निर्माण व्हावा, देशात वातावरण दूषित करण्याचा हेतू असू शकतो. यातून आपला देश अस्थिर करण्याचा कट असू शकतो त्यामुळे याप्रकरणी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.