22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरदोन हजारांची लाच घेताना महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

लातूर : प्रतिनिधी
कृषिपंपासाठी नवीन वीजजोडणी देण्याच्या कामासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती दोन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औसा येथील तुळजापूर टी-पॉइंटवर एसीबीच्या पथकाकडून शनिवारी दुपारी करण्यात आली. याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा शिवारात तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर शेती आहे. कृषिपंपासाठी नवीन वीजजोडणी देण्यासाठी ३९ वर्षीय तक्रारदाराने अर्ज केला होता. दरम्यान, महावितरण कार्यालय, शाखा बेलकुंड येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सतीश उत्तमराव कांबळे (वय ३८, रा. हंगरगा, ता. निलंगा) याने वीजजोडणीच्या कामासाठी १ डिसेंबर २०२३ रोजी १३ हजार आणि ६ डिसेंबर २०२३ रोजी दोन हजार असे एकूण १५ हजार फोन-पेवर तक्रारदाराकडून स्वीकारले. यासाठी तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला, तरीही काम झाले नाही. अखेर शुक्रवार, १७ मे रोजी तक्रारदाराने प्रलंबित कामाबाबत फोनवर संपर्क करून विचारणा केली. दरम्यान, तंत्रज्ञ सतीश कांबळे याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलिसा निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर, फारुक दामटे, भीमराव आलुरे, शाम गिरी शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, दीपक कलवले, गजानन जाधव संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR