17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजन  ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ सिनेमाला मनसेचा विरोध

  ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ सिनेमाला मनसेचा विरोध

मुंबई : प्रसिध्द पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान स्टारर ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. देशात २ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. कोणत्याही पाकिस्तानी अभिनेत्याला भारतात काम करू देणार नाही अािण त्याचा चित्रपट ही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली असून, राज यांनी स्वत: एक ट्वीट करत या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. यामुळे जर हा चित्रपट राज्यात प्रदर्शित झाला तर मनसेकडून खळ्ळखट्याक् होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.

कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळे ठीक आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करणे हा काय प्रकार सुरू आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका : राज ठाकरे
दरम्यान, मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणा-या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेतला तर महागात पडेल. याआधी असे प्रसंग आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्यातरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR