मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच संतापजनक लाट उसळली होती. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला होता. तो मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारला आहे.
९ डिसेंबर २०२४ ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराडच्या टोळीने खंडणीच्या प्रकरणातून हत्या केली होती. याप्रकरणी वाल्मिक कराडसह ८ जणांना अटक केली होती. पण, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ‘सीआयडी’ने आरोपपत्र दाखल केले आहे. यातच संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे आरोपपत्रातील फोटो बाहेर आले होते. हे फोटो पाहून राज्यात एकच हळहळ व्यक्त केली जात होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला होता.
सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, धनंजय मुंडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंना राजीनामा द्यावा, असे आदेश दिले होते.
अखेर मंगळवारी (४ मार्च) धनंजय मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाने ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. यानंतर मुंडेंनी राजीनामा दिला, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मुंडेंना मंत्रिपदावरून मुक्त केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले आहे.