26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeसंपादकीयनक्षल समस्या संपणार कधी?

नक्षल समस्या संपणार कधी?

नक्षलवाद ही छत्तीसगडमधील भळभळती जखम आहे. त्यावर विविध औषधांचा मारा करूनही ती भरून येत नाही. अधूनमधून तिचे वाहणे सुरूच आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ११ महिलांसह ३१ नक्षलवादी ठार तर २ जवान शहीद झाले. २ जवान जखमी झाल्याची माहिती आहे. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात ही चकमक झाली. नक्षलवाद्यांविरुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून कारवाई सुरू आहे. गत ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यंदा ४ मोठ्या नक्षलवादी कारवाया करण्यात आल्या आहेत. पहिल्या चकमकीत ५, दुस-या चकमकीत १२, तिस-या चकमकीत ८ नक्षलवादी मारले गेले आणि रविवारी ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

म्हणजे गत ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. हे सर्व नक्षलवादी राष्ट्रीय उद्यानात बस्तर एरिया कमिटीच्या कार्यकर्त्यांविरुद्धच्या कारवाईत मारले गेले. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. मोठ्या प्रमाणात एके ४७, एसएलआर, रायफल, बीजीएल लाँचर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. मुख्यमंत्री विष्णूदेव साय म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०२६ पर्यंत राज्य सरकार नक्षलवादाचा बिमोड करेल. नक्षलवाद संपवण्यासाठी सुरक्षा दल सातत्याने काम करीत आहे. नक्षलवाद हा देशाला लागलेला कर्करोग आहे. सैनिकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. सुरक्षा दलांनी गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. केंद्र सरकारने नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

गत १४ महिन्यांत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २७४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून ११६६ जणांना अटक केली आहे तसेच ९६९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. बिजापूर जिल्ह्यातील फरसेगड परिसरात रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. येथील राष्ट्रीय उद्यानाचे जंगल क्षेत्र नक्षलवाद्यांचा सक्रीय गड मानला जातो. ३१ मार्च २०२६ नंतर एकाही भारतीयाचा नक्षलवादामुळे मृत्यू होणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर ते बोलत होते. आम्ही नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करणार आहोत. भारत नक्षलमुक्त होण्याकडे वाटचाल करत आहे.

बिजापूर येथील घटनेने आम्हाला मोठे यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षापासून सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुस-या राज्यात स्थलांतरीत होत आहेत तसेच २ राज्यांच्या सीमांवरील अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात रविवारी कारवाई केली. या मोहिमेत तब्बल ६५० जवान सहभागी झाले होते. वर्षभरापासून सुरक्षा यंत्रणांनी छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात केलेल्या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. गत वर्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड दौ-यात मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपविणार असल्याचे वक्तव्य केले होते त्याचा पुनरुच्चार त्यांनी रविवारी केला. नक्षलवादी कारवायाच्या दृष्टीने देशात अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणा-या विभागात प्रामुख्याने ओडिशा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यांचा सीमाभाग येतो.

नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे हा परिसर नेहमीच दहशतीखाली असतो; परंतु सुरक्षा यंत्रणांच्या आक्रमक कारवायांमुळे ही चळवळ गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बस्तरमधील काही जिल्ह्यांत मर्यादित झाल्याचे चित्र आहे. गत काही वर्षापासून या भागात पोलिसांनी आक्रमकपणे सुरू केलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. गत वर्षभरात सुमारे दोनशेहून अधिक नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत. सातशेहून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ऐंशीच्या दशकात देशात फोफावलेल्या हिंसक नक्षलवादी चळवळींमुळे २० हजारांहून अधिक सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. शेकडो कोटींच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणा-या नक्षलवादी चळवळीला गत काही वर्षापासून उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. गत १० वर्षात १४ मोठ्या नक्षल नेत्यांना ठार करण्यात आले आहे. नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२६ वरून ३८ वर आली आहे. हिंसक कारवायांमध्ये ७३ टक्क्यांची घट झाली आहे. गडचिरोली जिल्हा सोडल्यास महाराष्ट्रही नक्षलवाद मुक्त झाल्याचे चित्र आहे. एकेकाळी गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जायचा.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने नक्षलविरोधी मोहिमा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले होते. दीर्घकाळापासून अस्तित्वात असलेली एखादी समस्या सोडवण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांनी आशावादी असणे वा तशा आशयाची विधाने करणे यात गैर, असे काही नाही. कारण यामुळे सुरक्षा दलाचा आत्मविश्वास दुणावतो मात्र हा आशावाद अतिरंजीत तसेच वास्तवाशी विसंगत नसावा तसे झाले तर राज्यकर्त्यांचे हसे होते. २०२६ पर्यंत देशातील नक्षल समस्या संपवू असे गृहमंत्री अमित शहा ४ महिन्यांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर नक्षल्यांनी हल्ला केला होता. त्यात ८ जवान शहीद झाले होते. रविवारच्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले म्हणजेच नक्षलवाद अजून संपलेला नाही. तो कधी संपणार? हा प्रश्न आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR