लातूर : प्रतिनिधी
नटवर्य श्रीराम गोजमगुंडे हे चित्रपट तसेच नाट्य कलेला पूर्णपणे वाहून घेतलेले महान व्यक्त्तिमत्व होते. आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, ही बाब मराठवाड्यातील कलाक्षेत्रासाठी अतिशय अभिमानस्पद असल्याचे प्रतिपादन बालरंगभूमी, मुंबईच्या उपाध्यक्षा दीपाताई क्षीरसागर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जिल्हा शाखा लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय (नाट्याशास्त्र विभाग) लातूरच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नटवर्य श्रीराम गोजमगुंडे स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी थाटात पार पडले. त्यावेळी त्या आपले मनोगत व्यक्त करत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माउली ग्रुपचे चेअरमन सीए व्ही. पी. पाटील, पोलाद स्टील जालनाचे अध्यक्ष जयेश कांतीलाल मेहता, सुनील गुरव, बाळकृष्ण धायगुडे, श्रीमती भारती श्रीराम गोजमगुंडे, अ. भा. नाट्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती
होती.
आपल्या मार्गदर्शनात दीपाताई क्षीरसागर पुढे म्हणाल्या की, श्रीराम गोजमगुंडे यांनी लातूरसारख्या ठिकाणी सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचे काम अतिशय निष्ठेने केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते नि:स्पृह कार्य करत राहिले. चांगले कर्म कायम स्मरणात राहते, असे म्हटले जाते. अगदी तसेच कार्य श्रीराम गोजमगुंडे यांनी केले. ते बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी , गुणवान अभिनेते होते. त्यांनी मराठवाड्यात सांस्कृतिक चळवळ, नाट्य चित्र सृष्टीला चालना देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. ऐतिहासिक, व्यावसायिक नाटकात, चित्रपटातही भूमिका केल्या. अशा ज्येष्ठ नटवर्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे, ही बाब अत्यंत सुखदायी असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रास्ताविक धनंजय बेंबडे यांनी केले. ही स्पर्धा आज दिवंगत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या स्मृतिदिनी होत असून पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा श्रीराम गोजमगुंडे यांच्या जन्मदिनी म्हणजे, दि. २५ ऑगस्टला आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जयेश मेहता, व्ही.पी. पाटील यांनीही आपले विचार व्यक्त्त केले. शाहीर संतोष दामटे यांनी नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या आठवणी विषद केल्या. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार पटकावणारा अभिनेता रमण देवकर यांचा दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे निमंत्रक विक्रांत गोजमगुंडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रमुख कार्यवाह धनंजय बेंबडे, उपाध्यक्ष अजय गोजमगुंडे, निलेश सराफ, कोषाध्यक्ष अमोल नानजकर, संघटक उमाकांत हुरदुडे, अविष्कार गोजमगुंडे, अनिल कांबळे, कल्याण वाघमारे, डॉ. अशोक आरदवाड, बाळकृष्ण धायगुडे, प्रदीप भोकरे, संजय अयाचित, अपर्णा गोवंडे, सुरेखा मदने, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, डॉ. मुकुंद भिसे, श्रुतिकांत ठाकूर, दीपरत्न निलंगेकर, अॅड. राणीताई स्वामी, सुधन्वा पत्की आदी मान्यवरांनी केले आहे.