मेलबर्न : वृत्तसंस्था
मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिस-या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरश: रडवले. तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३५८/९ धावा केल्या. भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावाच हिरो ठरला तो नितीश कुमार रेड्डी. त्याने शतकी खेळी करत भारताला संकटातून काढले. नितीश रेड्डीने १७१ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज क्रीझवर आहे.
टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा ११६ धावांनी मागे आहे. भारताने २२१ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. पण नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मानली नाही. या दोघांनी आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि दोघांनी १२७ धावांची विक्रमी भागीदारी करीत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.