पुणे : पुण्यातील गजबजलेल्या नवले पुलाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आलिशान मर्सिडीझ कारने स्प्लेंडरला जबरदस्त धडक दिली. यात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. कारमधील प्रवाशांचे प्राण एअरबॅग्जमुळे बचावले.
पुण्यातील वडगाव येथील बंगळुरू-पुणे महामार्गावरील नवले ब्रिजजवळ शनिवारी पहाटे सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. विशाल हॉटेलजवळ एक मर्सिडीझ कार आणि स्प्लेंडर दुचाकी यांची जोरदार धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर पाठीमागे बसलेली व्यक्ती जखमी झाली आहे.
बाईकला धडक दिल्यानंतर मर्सिडीझ कार नवले पुलावरील बॅरिकेड तोडून थेट सर्व्हिस रोडवर कोसळली. एअरबॅग्जमुळे अपघातग्रस्त कारमधील चालक आणि अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.