लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांनी ऊस लागवड करताना चांगल्या प्रतीचे बेणे जास्तीत जास्त रिकव्हरी उस जाती आदींचा विचार करुन उसाची लागवड करावी यासाठी या उस उत्पादक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यातून आपल्याला नवीन तंत्रज्ञान व सुधारीत पद्धतीचा वापर करुन कमी पैशात जास्तीचे उत्पादन करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस उत्पादक शेतक-यांचा परिसंवाद मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार धिरज देशमुख बोलत होते. यावेळी उस पीक वाढीसाठी मार्गदर्शक उस तज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस तज्ञ तथा गन्ना मास्तरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अंकुश चोरमुले, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक पंडित देसाई, कारखान्याचे संचालक अशोकराव काळे, धनराज दाताळ, शंकर बोळंगे, सदाशिव कदम, नीलकंठ बचाटे पवार, वसंत उपाडे, ज्ञानेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख यांनी मराठवाडयात लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वामुळे ऊसाची लागवड वाढली दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम झाली. मांजरा परिवाराने अत्यंत सूक्ष्म नियोजन करुन एफआरपी पेक्षा अधिक भाव उस उत्पादक शेतक-यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळें जिल्ह्यात शेतकर्याना आर्थिक सुबत्ता आली. काळानुरुप बदल होत असताना मांजरा साखर कारखान्याने उस तोडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करुन हार्वेस्टरद्वारे जास्तीत जास्त उसाची तोड करत आहेत. त्यामुळें आपण कमी खर्चात जास्त उत्पादन करता येईल याकडे या परिसंवादातून लक्ष द्यावे अशी अपेक्षा आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त्त केले.
सुरवातीला मांजरा कारखाना सुरु झाल्यानंतर बाहेरुन ऊस आणावा लागायचा. त्यानंतर जिल्ह्यात ओलिताखालील जमिनीचे क्षेत्र वाढले. आज मांजरा परिवार दिवसाला ५० हजार टन ऊसाचे गाळप करु शकतो एवढी क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आपल्या परिवारातील साखर कारखाने नावलौकिक असलेल्या कारखान्याच्या ब्रँड यादीत आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असे सांगून परिवाराने जे सातत्य अधिक भाव द्यायचे टीकवले आहे ते पुढील काळात उस उत्पादक शेतक-यांना योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे शेतक-यांनी एकरी ऊसाचे टनेज वाढविण्यासाठी आणि चांगल्या रिकव्हरीचा ऊस तयार करावा . त्यामुळे चांगला भाव शेतक-यांना मिळेल, असेही ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मांजरा साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी श्री टमके, सहाय्यक शेती अधिकारी ए. पी. पवार, ऊस पुरवठा अधिकारी प्रशांत शेळके, शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.