20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रनव मतदार नोंदणीत बहिणी आघाडीवर

नव मतदार नोंदणीत बहिणी आघाडीवर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक आयोगाने नव मतदारांच्या नावनोंदणीची मोहीम उघडली होती. या मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे राज्यात जवळपास १६.९ लाख नव मतदारांनी आपले नाव मतदारयादीत नोंदवले आहे. नाव नोंदवण्यामध्ये महिलांची संख्या ही मोठी आहे. त्यांनी यामध्ये पुरुषांना मागे टाकले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या’ बहिणी कोणाला धक्का देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव मतदारांमध्ये १० लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे. तर ६.८ लाख पुरुषांनी नव्याने नोंदणी केली आहे. यामुळे नोंदणीत महिला आघाडीवर आहेत.

नव्याने एकूण मतदारांची आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यातून जवळपास ९.५ कोटी मतदार मतदानाचा अधिकार विधानसभेला बजावतील. त्यात एकूण ४.९ कोटी पुरुष मतदार आहेत. तर ४.६ कोटी महिला मतदार आहेत. तर ५ हजार ९४४ मतदार हे तृतीयपंथी मतदार आहेत. नव मतदारांमध्ये १६४ तृतीयपंथीयांनी नोंद केली आहे. विशेष म्हणजे एकूण मतदारांचा विचार केला तर पहिल्यांदा मतदान करणा-यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. वय वर्ष १८ ते १९ असलेले मतदार हे एकूण मतदारांच्या फक्त २ टक्केच आहेत. दरम्यान नव मतदार नोंदणीत महिलांची संख्या वाढली असून, त्याचा फायदा महायुती, महाविकास आघाडी यापैकी कोणाला होणार हे निवडणुकीनंतरच कळेल.

विधानसभेत चांगलाच धुरळा उडणार

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहीम हाती घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारे मनोज जरांगे यांनी देखील प्रस्थापित नेत्यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. तर सत्ताधारी लाडकी बहीण योजनेच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत चांगलाच धुरळा उडणार आहे. तर लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला दणका देण्यासाठी उत्सुक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR