26.7 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूर हिंसाचार पूर्वनियोजित; एकनाथ शिंदे

नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित; एकनाथ शिंदे

मुंबई : मुघल सम्राट औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथून हटविण्याची मागणी जोर धरत आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. मात्र, या आंदोलनाने काल, सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये हिंसक वळण घेतले. नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड, दगडफेक तसेच जाळपोळ करण्यात आली. यात ३३ पोलिसांसह पाच नागरिक जखमी झाले. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यावेळी, औरंगजेबाचा फोटो आणि त्यात हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरून) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७.३०च्या सुमारास गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भालदारपुरा येथे १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.

याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेबाच्या उदात्तीकरणाला समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी सुरुवात केली. त्यांना विशिष्ट समाजातील काही मतांची जुळवणी करायची आहे. म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केली. तसेच, त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेब देशद्रोही होता आणि त्याचे उदात्तीकरण महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. जे जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.

औरंगजेबाची कबर हा एक कलंक असून तो पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. हे आंदोलन चुकीचे नाही, असे सांगून ते म्हणाले की, नागपूरला जी घटना घडली ती पूर्वनियोजित असल्याचे सकृतदर्शनी दिसते. मोमीनपुरा भागात त्यांच्या शंभर-दीडशे गाड्या पार्क असतात, पण सोमवारी तिथे एकही गाडी उभी नव्हती. त्यामुळेच हा पूर्वनियोजित कट होता, हा संशय बळावतो. याचा तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR