लातूर : प्रतिनिधी
नाफेडच्यावतीने पीएसएफ योजनेंतर्गत (खुल्या बाजारभावाने) पणन महासंघाच्या वतीने सबएजंट संस्थांकडून तूर खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील एकूण सहा केंद्राना परवानगी दिलेली आहे. नाफेड प्रथमच हमी भावात नव्हे, तर बाजारभावात तूर खरेदी करणार असल्याने शेतक-यांना त्याचा लाभ होणार असल्याचे जिल्हा मार्केंिटंग अधिकारी यांनी कळविले आहे. नाफेडतंर्गत तूर खरेदीसाठी लातूर जिल्ह्यातील जागृती प्रगती बिजो-उत्पादन प्रक्रिया पणन सहकारी संस्था म. लातूर, औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ म. औसा, रेणुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ म. रेणापूर, जिजामाता मिरची प्रक्रिया पणन सहकारी संस्था म. सेलु (बु) ता. लातूर, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म. देवणी व साताळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म. सताळा (खु) ता. अहमदपूर यांच्यामार्फत नोंदणी व खरेदीसाठी मंजूरी मिळालेली आहे.
शासनाने तुरीचा हमीभाव ७ हजार रुपये प्रति क्टिंल जाहीर केला आहे. परंतु, बाजारात सध्या ९ हजार ३०० रुपये ते ९ हजार ७०० रुपयेपर्यंतचे भाव सुरु आहेत. तरी शासनाने खुल्या बाजार भावाने तूर खरेदीसाठी आदेश दिलेले आहेत. शेतक-यांना या खरेदी केंद्रावर जावून चालू हंगामाचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते, आधारकार्ड व सुरु असलेला मोबाईल नंबर घेवूनच नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र ६३५४१ हेक्टर
लातूर जिल्ह्यात ऊसानंतर सोयाबीन आणि सोयाबीननंतर तूर हे नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी या तीन पिकांना सर्वाधिक पसंती देतात. यंदा जिल्ह्यात ५ लाख २ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ६४ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर ६३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्र ऊसाचे आहे. यंदा पाऊस जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी एवढाही पडलेला नाही. मध्यंतरी बेमोसमी पाऊस, गारपीट आणि रिमझीम पावसाने तूर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
गुरुवारी तुरीला होता ९३०० रुपये भाव
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गुरुवारी ६४१ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तुरीला कमाल भाव ९ हजार ७००, किमान ८ हजार ४०० तर सर्वसाधारण भाव ९३०० रुपये एवढा होता.