28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरनारायण पाटलांच्या राजीनाम्यामुळे करमाळ्याची समीकरणे बदलली?

नारायण पाटलांच्या राजीनाम्यामुळे करमाळ्याची समीकरणे बदलली?

रणजित जोशी
सोलापूर : करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीत जाणार? याविषयी चर्चा रंगल्या होत्या. माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते. नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे हे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.

नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकलूज येथे भेट घेतली असून ते २६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांची येत्या २६ एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती.

त्या कार्यक्रमात आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली होती.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माढ्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे. मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तो स्वीकार करावा, असे नारायण पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. नारायण पाटील २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले होते.

विद्यमान आमदार असूनही २०१९च्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषत: तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढवूनही नारायण पाटील यांना ७५००० मते मिळाली होती. ते दुस-या क्रमांकावर राहिले तर शिवसेनेकडून लढणा-या रश्मी बागल तिस-या क्रमांकावर राहिल्या. करमाळा तालुक्याच्या राजकारणात नारायण पाटील यांनी प्रतिकूल राजकीय परिस्थितीत स्थान निर्माण केले. मोहिते पाटील गटाशी नारायण पाटील यांच्या असलेल्या संबंधांमुळेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नारायण पाटील गटाच्या अनिरुध्द कांबळे यांनी भूषविले होते.

या घनिष्ठ संबंधांमुळेच नारायण पाटील यांनी मोहिते पाटील यांच्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून धैर्यशील मोहिते पाटील यांना नारायण पाटील यांच्या भूमिकेचा करमाळा विधानसभा मतदारसंघात मताधिक्यासाठी फायदा होणार आहे. करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे हे रणजितसिंह निंबाळकर यांचे समर्थन करत आहेत मात्र नारायण पाटील यांच्या समर्थनामुळे मोहिते पाटील यांची बाजूही भक्कम झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR