नाशिक : प्रतिनिधी
बागलाण मतदारसंघातील माजी आमदार दीपिका चव्हाण यांना १०.२ टक्के मते, चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल ९.८ टक्के मते, इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ ९.२ टक्के मते तर माजी आमदार निर्मला गावित यांना ११.२ टक्के मते मिळाली तर इतर उमेदवार असे एकूण १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यासह नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीचा सामना होईल अशी परिस्थिती होती. मात्र अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आलेत.
इगतपुरी मतदारसंघातील माजी आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसकडून दोनवेळा, शिवसेनेकडून एकवेळा आणि अपक्ष एकदा अशा चारवेळा निवडणूक लढवल्या आहेत. त्यांचा मोठा पराभव झाला. केवळ २३ हजार ७६७ मते मिळाल्यानं त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
माजी आमदार कोतवालांचा सहावा पराभव झाला. त्यांना चौथ्या क्रमांकाची २३ हजार ३३५ मते मिळाली. यात त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार
येवला – १०, मालेगाव मध्य -११, मालेगाव बा – १५, निफाड – ७, इगतपुरी – १६, दिंडोरी – ११, सिन्नर – १०, कळवण – ५, नांदगाव ११, चांदवड – १०, बागलाण – १६.
किती असते अनामत रक्कम
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार लोकसभेच्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. प्रवर्ग श्रेणीमधील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये भरावे लागतात. तर विधानसभेच्या उमेदवारांना १० हजार तर प्रवर्गासाठी ५ हजार रुपये भरावे लागतात.