31.2 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा

नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला आहे. नाशिकच्या अंबड पोलिस स्थानकाबाहेर गोंधळाचे वातावरण आहे. मतदार स्लीप वाटण्यावरून दोन्ही गटांत राडा झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांच्या स्लीप वाटपातून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात दोन गटांत वाद झाला. भाजप आणि ठाकरे गटाच्या समर्थकांनी अंबड पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. अंबड पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे मतदार स्लीप वाटत होते. या दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही बाजूने वाद झाला. प्रचंड भांडण सुरू झाले. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूने हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबड पोलिस ठाण्यात आले. यावेळी भाजपचे देखील कार्यकर्ते, पदाधिकारी अंबड पोलिस ठाण्याबाहेर आले आहेत.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंबड पोलिस ठाण्याबाहेर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा अंबड पोलिस ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये कालदेखील अशाचप्रकारचा राडा झाला होता. तो राडा भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता

ढिकले-गितेंच्या समर्थकांमध्ये बाचाबाची
दरम्यान, काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले आणि गणेश गिते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केला. तर गणेश गितेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्या फोडल्या, असा आरोप केला. हे प्रकरण देखील पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या राड्यानंतर पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR