24.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये सरपंचाकडून २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नाशिकमध्ये सरपंचाकडून २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एसटी स्टँडवर फिरणा-या नराधम आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे.
अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असताना आता नाशिकमध्ये क्रूरतेचा कळस गाठणारी अमानुष घटना उघडकीस आली आहे. येथील एका सरपंचाने गावातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे.

आरोपीने अहिल्यानगर, शिर्डी, त्र्यंबकेश्वरसह विविध ठिकाणी घेऊन जात मुलींवर अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सरपंचाला पीडित मुलींच्या आजीनेच साथ दिली आहे. आजीच्या संगनमतानेच आरोपीने पीडित मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळल्यानंतर अखेर पीडित मुलींनी पोलिस ठाण्यात धाव घेत या घटनेला वाचा फोडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीसह बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार आणि आजी संगीता अहिरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मागील काही दिवसांपासून आरोपीने वारंवार पीडित मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. त्याने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर आणि विटावे अशा ठिकाणी शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे.

धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपीसोबत जाण्यास जेव्हा पीडित मुलींनी नकार दिला, तेव्हा आजीने दोघींचा चावा घेत त्यांना शिवीगाळ केली. तसेच दमदाटी आणि मारहाण करत त्यांना घरात कोंडून ठेवले. आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळल्यानंतर अखेर मुलींनी चांदवड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी त्यांच्यावरील आपबिती पोलिसांना सांगितली. त्यांची व्यथा ऐकल्यानंतर पोलिसांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR