वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाची वक्रदृष्टी आता अमेरिकी एअरॉनॉटिक्स व अंतराळ व्यवस्थापन (नासा) संस्थेवर पडली असून, या संस्थेच्या दोन मोहिमा बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. कार्बन उत्सर्जन आणि रोपांच्या आरोग्याबाबत माहिती देणा-या या मोहिमा आहेत.
ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतक-यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा स्रोत बंद होऊ शकतो. अमेरिकेच्या २०२६ साठीच्या आर्थिक तरतुदीसंबंधी प्रस्तावात ‘ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्व्हेटरी’ मोहिमांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
‘नासा’चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डेव्हिड क्रिस्प यांच्यानुसार, या मोहिमा एक राष्ट्रीय संपत्ती आहेत. जगातील अशा प्रणालींच्या तुलनेत अचूक माहिती देणारे हे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. अमेझॉनसारख्या जंगलांत जेवढा कार्बन शोषून घेतला जातो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो उत्सर्जित होत असल्याचे या मोहिमांतून सिद्ध झाले आहे; तर, कॅनडा, रशिया आणि हिमनग ज्या भागांत वितळतात, अशा ठिकाणी असलेल्या जंगलांत कार्बन अधिक शोषून घेतला जातो.