मालेगाव : निवडणूक कामात कसूर केल्याच्या आरोपावरून मालेगाव बा मतदारसंघात कामकाज करणा-या १४ बीएलओंवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे, फोटो वगळणे आदी कामकाज सुरु आहे. मतदान प्रक्रियेशी निगडित कामे प्रथम प्राधान्याने करणे अपेक्षित असताना १४ बीएलओंनी संबंधित कामकाज पूर्ण केले नाही.
तसेच आढावा बैठकांना सातत्याने गैरहजर राहून कामाकडे दुर्लक्ष केले. निवडणूक कामकाजासंदर्भात संबंधितांनी नोटीस बजावून देखील या १४ बीएलओंनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
१४ बीएलओंनी मतदारयादीशी संबंधित कामकाज व घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली नाही. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटीसही बजावल्या होत्या. त्यालाही त्यांनी दाद न देत कामात कसूर करण्याचे धोरण कायम ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.