लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-२०२५ ही परीक्षा आज दि. ४ मे रोजी दुपारी २ ते ५ लातूर जिल्ह्यातील विविध ५१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. लातूर शहरातील परीक्षार्थींच्या सोयीसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहर वाहतूक बसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नीट परीक्षेसाठी लातूर शहरांत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी येत असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता नीट परीक्षेच्या दृष्टीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बैठकीमध्ये निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी शहरातील जास्तीत जास्त बससेवा परिक्षा केंद्राच्या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला असुन त्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. तरी खालील प्रमाणे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेमध्ये जास्तीत जास्त सिटी बसेस विद्याथ्र्यांसाठी मार्गावर उपलब्ध असुन याचे नियोजन खालील प्रमाणे आहे.
गंजगोलाई ते कोळपा (नांदेड नाका)- २ बसेस, गंजगोलाई ते छत्रपती चौक (वाडा हॉटेल जवळ) ते पीव्हीआर चौक-२ बसेस, गंजगोलाई ते हरंगुळ १२ नं. पाटी-२ बसेस, गंजगोलाई ते एमआयटी कॉलेज-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते हरंगुळ १२ नं. पाटी-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते पीव्हीआर चौक ते छत्रपती चौक (वाडा हॉटेल जवळ)-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते गंज गोलाई-२ बसेस. तरी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मनपा मार्फत आवाहन करण्यात येते की, लातूर मनपाने नियोजन केलेल्या सिटी बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व वाहतुक कोंडी टाळावी.