32.2 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रनीलम गो-हेंविरोधात अविश्वासाचा ठराव

नीलम गो-हेंविरोधात अविश्वासाचा ठराव

विधिमंडळ सचिवांकडे मविआचा प्रस्ताव
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. विरोधकांकडून नीलम गो-हे यांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव विधीमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आलो. विशेष म्हणजे नीलम गो-हे या अधिवेशन सुरू झाल्यापासून गेल्या दोन दिवसांपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेल्या नाहीत. पण त्या उद्या विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्या आजारी असल्याने अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकल्या नसल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी नीलम गो-हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे. तीनही पक्षांकडून एकत्रितपणे विधीमंडळ सचिवांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. नीलम गो-हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव का दाखल करण्यात आला? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ््या चर्चा सुरु आहेत. पण खरे कारण समोर आलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आज माध्यमांसोबत बोलताना त्यामागील कारण सांगितलेले नाही. त्यामुळे गो-हे यांच्यावरील अविश्वासाच्या प्रस्तावाबाबत सस्पेन्स वाढला आहे.

नीलम गो-हे या विधान परिषदेच्या उपसभापती बनल्या, तेव्हा शिवसेना एकसंघ होती. पण शिवसेना फुटीनंतरही नीलम गो-हे या त्याच पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे या मुद्यावरुन त्यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीलम गो-हे यांनी नुकतेच दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्यावर एक पद मिळायचे, असा आरोप नीलम गो-हेंनी केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे विरोधकांनी त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणला का? अशी चर्चा आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
खरा अविश्वासाचा प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशिरच झाला. आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या. अविश्वाचा प्रस्ताव आणल्यानंतर या अधिवेशनातच त्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. कुणीही असो, ज्याने एखाद्या नियमाचा आणि कायद्याचा भंग केला असेल, अविश्वासाचा ठराव ज्या कारणासाठी आणला ती कारणे तुमच्यासमोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR