लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात मान्सूनपूर्व अतिवृष्टी होऊन शहरातील अनेक भागातील घरात पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते. २७ मे रोजीच्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या पात्र लाभार्थ्यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवार, ५ जुलै रोजी लातूर तहसील कार्यालयात प्रतिनीधीक स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देत, आमदार देशमुख यांनी प्रशासनाच्या जलद पंचनामे आणि मदत वाटपाबद्दल समाधान व्यक्त केले. ‘आपत्ती कुणावरही येऊ नये, जरी दुदैवाने आलीच तरी आम्ही तुमची काळजी घेणारे आहोत’, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
या कार्यक्रमावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरवदे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी खाडगाव येथील अरुणा भास्कर फावडे, आकाश जुन्नी, जलसाबाई मगर, इमरान सय्यद, दाऊद पठाण, शेषेराव सावळे, हेमांगी स्वामी आणि गणेश स्वामी यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
२७ मे २०२५ रोजी दुपारी अचानक अतिवृष्टी झाली तेली गल्ली, इस्लामपुरा, कोल्हे नगर, म्हाडा कॉलनी, कृष्ण नगर, सम्राट चौक या सह शहरातील इतर सखल भागात काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर. त्याच दिवशी सायंकाळी शहराच्या विविध भागात स्वत: आमदार देशमुख यांनी भेट देऊन नुकसानीची पहाणी केली होती. आपद्ग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर लातूरच्या तहसीलदारांना शहरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार तहसील कार्यालयाने पाहणी करून पंचनामे पूर्ण केले या कामी प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यानंतर आपदग्रस्तांना मदत मिळावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व शासनाकडे पाठपुरावा केला.
या प्रातिनीधीक स्वरुपातील अनुदान वाटप प्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, वाहतूक ठप्प झाली आणि सामान्य माणूस अडचणीत सापडला होता. आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले, नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तात्काळ सूचना केल्या. या सर्व परिस्थितीची प्रशासनाला जाणीव करून दिल्यामुळे त्यांनी जलद गतीने पावले उचलून अल्पावधीमध्ये पंचनामे केले आणि आज मदतही जलद गतीने नागरिकांना मिळत आहे, याचे आम्हाला समाधान आहे.