मुंबई : प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोजक्या वाक्यांत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला, असे अजितदादा पवार यांनी म्हटले. अजितदादा विधिमंडळाच्या परिसरात आल्यावर त्यांना माध्यमांनी गराडा घातला. यावेळी अजितदादांचा चेहरा जरा गंभीर झालेला दिसला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी झाला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तीन महिन्यांपासून सातत्याने होत होती. पण, ‘आका’चे ‘आका’ राजीनाम्यावर चूप होते. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अपरिहार्यता म्हणून राजीनामा : सुषमा अंधारे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे. मागच्या अधिवेशनात जो घटनाक्रम आमदार सुरेश धस यांनी सांगितला तो जशास तसा देशमुख हत्या प्रकरणातले फोटो बघून घडला आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस यांना हे सगळे आधीच माहीत होते.
‘मग अडीच-तीन महिन्यांपासून मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल,’ असे वाक्य फडणवीस का उच्चारत होते? अडीच-तीन महिने देवेंद्र फडणवीस यांनी कोणता राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला,’’ असा सवाल शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.