मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल जारी केला आहे. यामागचे कारण असे की, नोंदणी मुद्रांक विभागाच्या ब-याच उपक्रमांत संगणकीकरणाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर विकास व देखभालीचा खर्च तसेच नेटवर्कवरील खर्च वाढत आहे. विविध कामांसाठी ३५ प्रणाली कार्यरत आहेत.
जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर यंत्रणा सुरू असल्यामुळे त्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क आणि सर्व्हरसाठी मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे, असे कारण देण्यात आले आहे. दस्त हाताळणी शुल्कात वाढ करायची असेल तर नोंदणी शुल्क कशासाठी ठरवण्यात येते आहे असा प्रश्न असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरने उपस्थित केला आहे.
राज्यभरात पहायला गेलं तर साडेतीन लाख दस्तांची नोंदणी होते. त्याच्या पटीने सव्वाचार हजार कोटींचा महसूल गोळा केला जातो. त्यामुळे दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयामुळे महसुलातही वाढ होणार आहे. ही वाढ २० रुपयांवरून ४० रुपये अशी करत असल्यामुळे याचा आर्थिक फटका नागरिकांना सोसावा लागणार आहे.