19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसोलापूरपंढरीत ५ लाखांवर भाविक दाखल

पंढरीत ५ लाखांवर भाविक दाखल

पंढरपूर/ प्रतिनिधी (अपराजित सर्वगोड)
महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरीत सावळ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशी सोहळ्यास राज्याच्या कानाकोप-यातून सुमारे ५ लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीनगरी दुमदुमून गेली आहे. गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर २०२३ कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी पहाटे २.२० मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह सत्ताधारी गटाचे आमदार, खासदार, राज्यातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

पंढरीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाचा कार्तिकी वारी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत आहे. दोन दिवसांपासून दर्शन रांगेत सुमारे ३० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी उभे राहून दर्शन घेत आहेत. दर्शनासाठी सुमारे १५ तास लागत आहेत. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. याच बरोबर भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दर्शनासाठी १० पत्रा शेडची निर्मिती करण्यात आली असून भाविकांना दर्शन रांगेत कुलरची व्यवस्था, विश्रांतीसाठी कक्ष उभारण्यात आला. तसेच पिण्याचे पाणी, चहा, मोफत भोजनाची व्यवस्था तसेच तात्काळ औषधोपचार आणि इतर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. याच बरोबर मंदिर परिसर आणि ६५ एकर येथे लाडू प्रसाद केंद्र उभारण्यात आले आहे.

दरम्यान, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असून, बुधवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शन रांग पत्रा शेडमधून गोपाळपूरपर्यंत पोहोचली होती. कार्तिकी सोहळ्यास पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी येथील ६५ एकर परिसर आणि शहरातील विविध मठांमध्ये आश्रय घेतला आहे. या ठिकाणी भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि आरोग्य सुविधा, पंढरपूर शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने भर दिला आहे. पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेच्या वाळवंट परिसर गजबजून गेला आहे.

चंद्रभागा ओसंडून वाहतेय
सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास विलोभनीय विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी बुधवारी उशिरा चंद्रभागेत आल्याने चंद्रभागा नदीचे पात्र ओसंडून वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागेत स्नान करण्याचा आणि डुबकी घेण्याचा मोह भाविकांना आवरत नसल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीच्या प्रत्येक घाटावर सुरक्षा पथकातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR