24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींची माफी विरोधकांनी फेटाळली

पंतप्रधान मोदींची माफी विरोधकांनी फेटाळली

पुतळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई : राज्यामध्ये सध्या राजकोट प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांपूर्वी बसवण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी तीव्र रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी माफी मागितली. दरम्यान महाविकास आघाडीने पंतप्रधान मोदींच्या माफीला धुडकावून लावले आहे.

पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी म्हटले की, सिंधूदुर्गामध्ये जे झाले ते वाईट झाले. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. माफी मागीतल्या नंतर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. मात्र महाविकास आघाडी मागे हटायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रायश्चित अटळ : जयंत पाटील
जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ’’भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय.’’

महाराजांची तुलना सावरकरांशी
आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाहीत जे दरवेळी भारतमातेचे आणि या महाराष्ट्राचे महान सुपुत्र वीर सावरकर यांना शिव्या देत असतात, अपमानित करत असतात. तरीही वीर सावरकर यांना शिव्या देणारे माफी मागण्यास तयार नाहीत उलट ते कोर्टात जाऊन लढाई लढण्यास तयार आहेत. अशा शब्दांत मोदींनी यावेळी नाव न घेता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

माफी मागण्यात कच खाल्ली : चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली आहे. खरेतर त्यांनी किंतूपरंतु करत माफी मागितली. सावरकर आणि शिवाजी महाराज यांची तुलना करण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दौ-यापूर्वी काँग्रेसचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौ-यावेळी आंदोलनाच्या तयारीत असलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून धरपकड सुरु केली होती. यामुळे खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. मुंबई पोलिसांनी सकाळपासून वर्षा गायकवाड यांना त्यांच्या घरीच स्थानबद्ध करुन ठेवले होते. याबद्दल संताप व्यक्त करताना वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, मी फरार आहे का, अतिरेकी आहे का, मी एखाद्या गुन्ह्यात सामील आहे का? फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय? जिथे शासन केले पाहिजे, तिकडे तुम्ही शासन करत नाही आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR