28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeलातूरपंतप्रधान मोदींची सभा व्यवसायिकांच्या मूळावर!

पंतप्रधान मोदींची सभा व्यवसायिकांच्या मूळावर!

लातूर : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लातूर येथे भाजप खा.शृंगारे यांच्या प्रचारासाठी येत असून त्यांची प्रचार सभा लातूर येथील गरूड चौकाच्या बाजूस बिर्ले फार्म येथे होत आहे.सभेची पूर्व तयारी अथवा सुरक्षेच्या कारणांवरून २९ व ३० एप्रिल रोजी परिसरातील सर्व छोटी-मोठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे छोटे- मोठे व्यावसायिक,दुकानदार यांना आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान,लातूर येथे लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजले असून काँग्रेस- भाजपामध्ये चुरसीचा सामना होणार असून आज भाजपाचे खा.शृंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी लातूर येथे येत आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणांवरून परिसरातील दुकाने, हॉटेल, चहाटप-या, पानटप-या, गॅरेज आदी दुकाने २९ व ३० एप्रिल दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश आले असून दोन दिवस जो आर्थिक भुर्दंड व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. त्याची भरपाई कोण करणार? शासन की ज्यांच्या प्रचारासाठी आले आहेत तो उमेदवार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवसें दिवस महागाई, बेरोजगारी आणि लातूर येथे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अगोदरच कोलमडलेला छोटा व्यवसायिक ज्यांना कुठलेही अनुदान अथवा नुकसान भरपाई मिळत नाही. कोरोना काळात २ वर्षे आर्थिक संकटात सापडलेला मध्यमवर्गीय व्यावसायिक आता दोन दिवस आपल्या सोबत इतर कर्मचा-यांचे रोजगार कसे देणार? तरुणांना रोजगार देण्याचा दावा करणा-या सरकारने दोन दिवस तरुणांचा रोजगारच हिरावून घेतला. मोदींची सभा छोट्या-मोठ्या व्यवसायिक व रोजगा-यांच्या मूळावर पडल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

वाहतूक मार्गात बदल, नागरिकांची गैरसोय : सभा स्थळाकडे येणारी वाहने व इतर सर्व प्रकारांच्या वाहनास ३० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिबंध घातल्यामुळे लातूरकरांची खूपच गैरसोय होणार आहे. अडचणीच्या वेळेस अथवा तात्काळ इतर ठिकाणी पोहचायचे असेल तर पर्यायी मार्ग अवलंबावा लागणार आहे.
सतत वीजप्रवाह खंडीत : सभा स्थळी लाईट, पाणी, सभामंडप, वृक्षतोड, रोटर फिरवणे आदी कामे चालू असल्यामुळे सतत सभा परिसरात वीज प्रवाह बंद करत असल्याने नागरिकांना गेली आठ दिवसापासून प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR