29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरातील लढत अटीतटीची

कोल्हापुरातील लढत अटीतटीची

डॉ. राजेंद्र भस्मे : कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. हा मतदार संघ दूध प्रकल्प, ऊस शेती, ऊस कारखान्यांसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. कोल्हापूरला स्वत:ची ऐतिहासिक ओळख आहे. या मतदारसंघामध्ये चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर असे सहा विधान सभा मतदार संघ येतात. चंदगड कागल हे मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गट कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर हे काँग्रेस गटाकडे आहेत राधानगरी येथील आमदार मात्र शिवसेना शिंदे गटाचे आहे

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला नवी दिशा देणारा मतदारसंघ म्हणजेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, असे म्हणावे लागेल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी पहिल्यांदाच शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी एक वाक्यता दाखवली. मात्र, शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात आला. मात्र, आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरून चांगलेच राजकारण तापले आहे. शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय मंडलिक हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती अशी ही लढत होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही शाहू महाराजांना पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये इतरही उमेदवारांचा समावेश असला तरी थेट लढत या दोन्ही उमेदवारांमध्येच होईल. वास्तविक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अनेक विषय आणि अनेक मुद्दे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत मात्र, केवळ भावनिक मुद्यावरच चर्चा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या ऐवजी शाहू महाराज यांचे खरे वंशज कोण? असा प्रश्न उपस्थित करत संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती. आणि तेव्हापासूनच हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक देखील भावनिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रण तापले असताना महायुती – महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. कोल्हापुरात सुरुवातीला निश्चितपणे विजयी होणार इतपत असणारा दावा आता लाखाच्या घरात पोहोचला आहे. महायुतीचे संजय मंडलिक अडीच लाखाने विजयी होतील असा दावा केला जात आहे. तर श्रीमंत शाहू महाराज हे तीन लाख अधिक मतांनी विजयी होतील, असा प्रतिदावा केला जात आहे. याउलट, हातकणंगलेत चुरशीची बहुरंगी असताना विजयाचे केवळ दावे केले जात आहे. सुरुवातीला विजय निश्चित होणार इतपत सीमित असणा-या दाव्याला लाखांच्या मताधिक्याचे मजबूत वजन प्राप्त होऊ लागले आहे. याची सुरुवात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चंदगड तालुक्याच्या दौ-यावर केली.

तेव्हा त्यांनी शिंदे सेनेचे संजय मंडलिक यांना या तालुक्यातून लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पाठोपाठ याच तालुक्यातील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून शाहू महाराजांना पाठिंबा दिला. तेव्हा त्यांनी तालुक्यातून ५० हजारांचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नुकत्याच चंदगड दौ-यावर गेलेले संभाजीराजे छत्रपती यांनी २००९ सालच्या निवडणुकीत या तालुक्याने मला मोठे मताधिक्य दिले होते. तीच परंपरा याही वेळी राहील, अशी खात्री व्यक्त केली.कागल तालुका हा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत विशेष चर्चेत आला आहे. संजय मंडलिक हे याच तालुक्याचे आहेत. खेरीज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे असे तीन तगडे नेते या तालुक्यात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR