प्रयागराज : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नान केले. त्यांनी संगमावर डुबकी लावली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये अमृतस्नान करीत होते. अमृतस्नानानंतर त्यांनी गंगेला दूध अर्पण केले आणि पूजा केली.
पंतप्रधान मोदी मोटरबोटने योगींसह संगमावर पोहोचले. यावेळी त्यांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. याशिवाय गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. मंत्रोच्चारणादरम्यान मोदींनी एकट्यानेच संगमावर डुबकी लावली. ५४ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाकुंभमधील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते १३ डिसेंबरला महाकुंभमध्ये आले होते.
भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी बमरौली एअरपोर्टमधून हेलिकॉप्टरने अरैलला पोहोचले. येथून बोटीने ते महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी आहे. पंतप्रधान मोदींची उपस्थिती असल्याने महाकुंभमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संगमावर पॅरामिलिटरी फोर्सदेखील तैनात करण्यात आली आहे.