29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही हजेरी लावणार

पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही हजेरी लावणार

शपथविधीला लाडक्या बहिणी, शेतकरी उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून, ते मुख्यमंत्री म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेही शपथ घेऊ शकतात. तसेच महायुतीतील नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या शपथविधी सोहळ््याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षातील प्रमुख नेते, साधू-संत, लाडक्या बहिणी, शेतकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच राज्यभरातून भाजप महायुतीचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ््याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भाजपाकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

यासोबतच १५ हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतक-यांसह हजारो भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, त्यांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासोबतच मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांनी आम्हाला भरीव मदत केली. अशा ५ हजार सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हेही येणार आहेत. वारकरी पंथाचे लोक येणार आहेत. डबेवाले येणार आहेत. ४० ते ५० हजार कार्यकर्ते या सभास्थळी असतील. याशिवाय २ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. हा शपथविधी सोहळा लाईव्ह दाखविला जाणार आहे, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

साधू संतही हजेरी लावणार
महायुती सरकारच्या शपथविधीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी नाणिजचे नरेंद्र महाराज, भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज, इस्कॉनचे राधानाथ स्वामी महाराज, गौरांगदास महाराज, जनार्दन हरिजी महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महानुभाव संप्रदायाचे मोहन महाराज यांच्यासह जैन मुनी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलिवूडचे कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR