सोलापूर-सध्या महाराष्ट्रात व केंद्रात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आहे. या दोन्ही सरकारकडून विकासाची कामे जोमाने चालू आहेत. त्यामुळे जगात भारताने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करण्याबरोबरच सरकारी योजनाही जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. प्रारंभी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी मंत्री महाजन यांचा सत्कार केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, राम तडवळकर उपस्थित होते.
रचनात्मक पध्दतीने काम करून कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहावे. अशा पध्दतीने काम झाले तर त्याचा निवडणुकीत निश्चितच लाभ होतो. मी माझ्या मतदारसंघात जवळजवळ ९० टक्के लोकांपर्यंत अशा कामांच्या माध्यमातूनच पोहोचत असतो.त्यामुळे मला गेल्या ४० वर्षांपासून जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. आपण पक्षाचे काम करीत रचनात्मक कामामधून जनतेपर्यंत पोहोचलात तर आपणाला कोणीच रोखू शकणार नाही, असेही महाजन म्हणाले.