जळकोट : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील अफरोज खुर्सिद पठाण वय २५ हा युवक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जळकोटकडे येत असताना जळकोट पासून जवळच असलेल्या जांब येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुर्दैवाने कंटेनर खाली सापडला व या त्याचा जागीच मृत्यू झाला.
उस्माननगर येथील अफरोज याची पत्नी आजोळी म्हणजेच जळकोट येथे आली होती. पत्नीला भेटण्यासाठी अफरोज खुर्शीद पठाण दि. ३१ रोजी दुचाकी क्रमांक एमएच २६ सीके ०८५८ वरुन उस्माननगरकडून जळकोटला येत होता. मुखेडहून शिरुरकडे सिमेंट वाहतूक करणा-या कंटेनर एमएच २९ टी १६९३ ने दुचाकीला धडक दिली. त्यात अफरोजचा मृत्यू झाला. जळकोट पासून जवळ असलेल्या जांब चौकामध्ये सतत ट्रॅफिक जाम होत असते, बिदर ते नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जांब येथूनच गेलेला आहे यासोबतच निजामाबाद ते लातूर हा राज्य महामार्ग देखील जांबवरूनच गेलेला आहे. यामुळे दोन्हीकडून वाहने येत असल्यामुळे तसेच जांब येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळेच अफरोजचा बळी गेल्याची चर्चा जांब येथे होत होती.