छ. संभाजीनगर : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारताच दानवे चांगलेच भडकले. पत्रकारांनी काड्या करू नये, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत या वादावर सविस्तर चर्चा होऊन ते मिटले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी आमच्या पक्षात लुडबुड करू नये, आमच्यातील वाद मिटवायला आम्ही सक्षम आहोत.
तुम्ही तुमचे काम करा. आंदोलनाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा, नाहीतर छापू नका, अशा शब्दात दानवे यांनी पत्रकारांवर राग काढला. ‘लबाडांनो पाणी द्या’ या आंदोलनाची माहिती देण्यासाठी अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. समांतर पाणीपुरवठा योजना भाजपाने बंद पाडली. त्यांनीच योजनेच्या विरोधात मोर्चे काढले.
संभाजीनगरकरांना नियमित पाणी मिळत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत जनतेची माफी मागितली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना पाणीपुरवठा योजनेला वेग दिला होता. परंतु त्यानंतरच्या एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ही योजना रखडली आहे. अजूनही एक वर्ष शहराला पाणी मिळू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
आमची सत्ता, महापौर असताना आम्ही किमान दोन-तीन दिवसाला पाणी देत होतो. त्यानंतर आता तीन-साडेतीन वर्ष उलटली आहेत. त्यामुळे सत्ता आल्यानंतर सहा महिन्यात पाणी देऊ, तीन महिन्यात पाणी देऊ सांगर्णायांनी लबाडी केली. त्यांना जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, आणि म्हणून हे आंदोलन आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकाराने चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या वादावर प्रश्न विचारताच ते भडकले.
यÞा आंदोलनावर तुमच्यात आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद होते. ते काल शमले, पण आज पून्हा ते दिसत नाहीयेत,याबद्दल विचारले, तेव्हा पत्रकारांनी काड्या करू नये, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. खैरेंनी केलेल्या आरोपांवर मी काहीही बोललो नाही. काल नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली, आमच्यात वाद नाही हे सांगितले. तेव्हा कृपया काड्या करू नका, बातम्या देण्याचे तुमचे काम आहे. आमच्या पक्षातील वाद, प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत, असे दानवे म्हणाले.
पाणी प्रश्न सरकार आणि प्रशासन सोडवणार असेल तर पालकमंत्री आणि आयुक्तांनी समोर येऊन सांगावे, आम्ही आंदोलन रद्द करू. उन्हात आंदोलन करण्याची आम्हाला हौस नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सत्ताधा-यांना आव्हान दिले. संभाजीनगरकरांना पाणी मिळाले पाहिजे, या भावनेतून आम्ही हे आंदोलन हाती घेतले आहे, यात आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही दानवे म्हणाले.