29.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमुख्य बातम्यापरदेशातून ‘एमबीबीएस’साठी ‘नीट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य!

परदेशातून ‘एमबीबीएस’साठी ‘नीट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी ‘नीट’ची परीक्षा देऊन ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवतात. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. अशा भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून ‘एमबीबीएस’ करण्यासाठी ‘नीट-युजी’ परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी ‘नीट-युजी’ पात्रतेची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा नियम कायम ठेवला असून, विद्यार्थ्यांना परदेशी संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी ‘नीट’ उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. २०१८ मध्ये आलेल्या या नियमानुसार, परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणा-या भारतीय विद्यार्थ्याने भारतात वैद्यकीय सराव करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

हा नियम न्याय्य, पारदर्शक असल्याचे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. ‘नीट-युजी’साठी पात्र होण्यासाठी आवश्यक पदवी वैद्यकीय शिक्षण नियम, १९९७ मध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी.आर . गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

खंडपीठाने सांगितले की, आम्हाला नियमांमध्ये ढवळाढवळ करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, सुधारित नियमांच्या अंमलबजावणीनंतर जर एखाद्या उमेदवाराला प्राथमिक वैद्यकीय पात्रता प्राप्त करण्यासाठी परदेशी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तर तो देशांतर्गत वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या नियमांतून सूट मागू शकत नाहीत. यामुळे भारताबाहेर कुठेही सराव करण्याच्या त्यांच्या अधिकारावर मर्यादा येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR