परभणी : उस्ताद डॉ. गुलाम रसुल यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली ६ वर्षे परभणीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे हे ७ वे वर्ष असुन यावर्षी उस्ताद गुलाम रसुल यांच्या शिष्या नलिनी बीडकर, वीणा मांडाखळीकर व इतर शिष्यगण गानसेवा अर्पण करून महोत्सवाला सुरूवात करणार आहेत. या महोत्सवाचे दि.८ व ९ रोजी पार्वती मंगल कार्यालय परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात शनिवार, दि.८ रोजी महागामी गुरूकुल पार्वती दत्ता यांच्या शिष्या ओडीसी नृत्य सादर करणार आहेत. पं. प्रभाकर कारेकरांचे शिष्य पं. सुनील कुलकर्णी (दिल्ली) यांचे गायन तसेच धारवाडचे सुप्रसिद्ध गायक पं. कुमार मर्डुर यांच्या गायनाने पहिल्या दिवशीची सांगता होणार आहे. रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी पं. कृष्णेंद्र वाडीकरांचे शिष्य रोहन गावडे (छत्रपती संभाजीनगर) यांचे गायन, प्रबोध जोशी (व्हायोलीन) व निरंजन भालेराव (बासरी) यांची जुगलबंदी होणार असून समारोहाची सांगता सायली तळवलकर (मुंबई) यांच्या गायनाने होणार आहे.
देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने गेली ७ वर्षे मराठवाड्यात विविध ठिकाणी शास्त्रीय संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यात येते आहे.
सेलू, जालना, फुलंब्री, शेंदुरवादा, परभणी येथील महोत्सवांसोबतच अंबडच्या शतकपुर्ती संगीत महोत्सवाच्या आयोजनातही प्रतिष्ठान आपले योगदान देत आहे. प्राचीन वास्तुंच्या परिसरांत शास्त्रीय संगीताचे सादरीकरण ही एक अतिशय वेगळी चळवळ प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येते. मासिक संगीत सभेचे आयोजनही सुरू करण्यात आले आहे. उस्ताद डॉ. गुलाम रसूल संगीत महोत्सवाला रसिक, संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकांत उमरीकर, मल्हारिकांत देशमुख, देवीदास अधार्पूरकर, प्रा. कृष्णराज लव्हेकर यांनी केले आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.