परभणी : शहरातील बस स्थानक ते निरज हॉटेल रस्त्यावरील धानोरकर हॉस्पिटल पासून भरोसे यांच्या घराकडे जाणा-या पुलावरील एका खड्डयात दुचाकी आदळून दांम्पत्य खड्ड्यात कोसळल्याची घटना बुधवार, दि.१६ रोजी दुपारी घडली. त्यानंतर परीसरातील नागरीकांनी तातडीने धाव घेत खड्ड्यात लोखंडी शिडी टाकून दोघांनाही खड्ड्याबाहेर काढले. या दोघांचेही दैव बलवत्तर म्हणून मोठा मार लागला नाही. दरम्यान हा पूल व खड्डा पाडण्याची मागणी नुकतीच परभणी शहर विकास मंचचे सुभाष बाकळे यांनी केली होती. मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला असून या प्रकरणी संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीक करत होते.
शहरातील बस स्थानक पासून हॉटेल निरजकडे जाणा-या रस्त्यावरील धानोरकर हॉस्पिटल शेजारी पूल असून यावरून भरोसे यांच्या घराकडे रस्ता जातो. या ठिकाणचा धोकादायक पूल पाडण्यात यावा अशी मागणी परभणी शहर विकास मंचाचे कार्यकर्ते सुभाष बाकळे यांनी पंधरा दिवसापूर्वीच महापालिका प्रशासनाला केली.
परंतू कुठलेही गांभीर्य नसलेल्या मनपाने, अभियत्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे बुधवारी दुपारी दुचाकीवरून जाणारे एक दांम्पत्य या पुलावरील खड्डयात कोसळले. खड्डा एवढा खोल होता की, या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी आत मध्ये लोखंडी शिडी सोडावी लागली. त्यानंतर नागरीकांच्या मदतीने एक- एक करून दोघांनाही खड्ड्या बाहेर काढण्यात आले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान संबंधीत घटनेची वरीष्ठ अधिका-यांनी दखल घेवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी संतप्त नागरीकांतून होताना दिसून येत होती.