मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरून रस्सीखेच सुरू आहे.
याच सर्व घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. शरद पवारसाहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जवळजवळ शिजत आहे असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व शरद पवार यांना केली आहे, तर आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवले जाईल, अशी भूमिका आघाडीतील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. पवारांच्या भूमिकेला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे.
शिवाय महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये पाहता ठाकरे हा आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना चिमटा काढला. तर उद्धव ठाकरेंची इच्छा होती की, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून आघाडीने निवडणूक लढवावी.
शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाहीत हे स्पष्ट केले आणि नाना पटोलेंनीही त्याची री ओढली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही हे सांगू शकतो. पण त्यांच्या डोक्यात कोण आहे, हे सांगणं फार कठीण आहे असेही ते यावेळी म्हणाले.
ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही
दरम्यान, उद्धव ठाकरे दिल्लीला सोनिया गांधींची भेट घ्यायला गेले तेव्हा त्यांना एकही फोटो काढू दिला नसल्याचा दावा फडणवीसांनी केला. ते म्हणाले, मध्यंतरी तीन दिवस ठाकरे दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीने त्यांचा चेहरा पुढे करावा यासाठी ते प्रयत्न करत होते. आम्ही दिल्लीला गेलो की, ठाकरे आमच्यावर टीका करतात. पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधींसोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही.
फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर…
देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या मनातही मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव नाही, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.