लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात २१ वी पशुगणना केली जात असून ती २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पशु गणगननेत जिल्हयातील पाळीव प्राणी, कुक्कुटपालन व भटक्या प्राण्यांची संख्या, त्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती, आणि मालकी हक्क यासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे. आज घडीला पशु गणननेचे काम ८७ टक्के पूर्ण झाले असून लातूर जिल्हा पशु गणगननेत महाराष्ट्र राज्यात दुस-या स्थानी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील पशुगणना मोहीम अंतिम टप्प्यात आहे. पशुगणना ही केवळ आकडेवारी न राहता, ती पशुधनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पशुपालकांना अनुदान, तसेच विविध पशुसंवर्धन कार्यक्रमांसाठी अचूक माहिती मिळावी यासाठी पशुगणना अनिवार्य आहे.
भारतामध्ये १९१९ पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. यापूर्वी २०१९ रोजी २० वी पशुगणना झाली होती. आता २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. राज्यातील व जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर व त्यांच्या चमूने प्रभावी कृती आराखडा तयार करून सतत फिल्ड दौरे, बैठकाद्वारे पशुपालकांना प्रोत्साहन दिले.