लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पशुसंवर्धनच्या तालुकास्तरीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये विभागीय स्तरावरील उत्कृष्ट संस्था प्रथम क्रमांक डॉ. हणमंत गायके पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, खरोळा, जिल्हास्तरावरील उत्कृष्ट पशुधन विकास अधिकारी (विस्तार) द्वितीय क्रमांक डॉ. विजय घोणशीकर पंचायत समिती, उदगीर, तृतीय क्रमांक डॉ. शिवानंद मुक्कनवार पंचायत समिती, निलंगा, तसेच तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय स्तर प्रथम क्रमांक डॉ. सुधाकर साळवे जिल्हा पशुसर्वचिकित्सालय, लातूर, द्वितीय क्रमांक डॉ. सत्यविजय जाधव तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय, बाभळगाव, ता. लातूर, तृतीय क्रमांक डॉ. कृष्णा पांडे, तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय, उदगीर यांचा सत्कार करण्यात आला. लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्व पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी डॉ. शिंदे म्हणाले की, १०० दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या १० महत्त्वाच्या सुधारणा मुद्द्यांचा आढावा घेतला. या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व कर्मर्चायांनी संघभावनेने आणि मेहनतीने कार्य केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, विभागाचे नेतृत्व करणा-या डॉ. नाना सोनवणे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुरावा यामुळेच लातूर जिल्हा विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकावर पोहोचत, अंतिम मूल्यांकनासाठी क्यूसीआयकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याचा निकाल २४ मे २०२५ रोजी अपेक्षित आहे.